छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अवघ्या ५० वर्षांच्या आयुष्यात असामान्य कर्तुत्वाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. कोकणातील एक सामान्य डोंगराला राजधानी बनविले आणि वैभव प्राप्त करून दिले. तोच हा किल्ले रायगड. महाराजांच्या वास्तव्यामुळे किल्ले रायगडला तीर्थाचे स्वरूप प्राप्त झाले. कोणत्याही ऋतूत गेले तरी रायगडाचे बदलते रूप आपल्याला काही तरी नित्य नवे दाखवीत राहते.
किल्ले रायगडाची इतिहासात वेगवेगळी नावे किंवा उपमा सापडतात.
१. रासिवटा २. नंदादीप ३. राजगिरी ४. रायरी ५. जम्बुद्वीप ६. तणस ७. बदेनुर ८. रायगिरी ९. रायगड १०.इस्लामगड ११. पूर्वेचा जिब्राल्टर १२. भिवगड १३. रेड्डी १४. शिवलंका १५. राहीर
भौगोलिक माहिती -
किल्ले रायगड हा सध्याच्या शासकीय रायगड जिल्ह्यातील महाड या तालुका ठिकाणा पासून उत्तरेला २४ कि.मी. अंतरावर आहे. त्याची उंची समुद्रसपाटीपासून २८५१ फूट (८७० मीटर) आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये हा स्वतंत्र उभा असलेला डोंगर असून त्यावर मोठी सपाटी आहे. रायगडाच्या पूर्वी राजधानी असलेल्या राजगडावर इतकी प्रशस्त जागा नव्हती. राजधानी म्हणून निवड करीत असताना महाराजांनी रायगडचे भौगोलिक स्थान लक्षात घेतले. एकाचवेळी समुद्रमार्गाने येणारे आक्रमक, संपूर्ण कोकणकिनारपट्टी, बंदरांमधून होणारा व्यापार तसेच घाटमाथ्यावर लक्ष ठेवत असताना शत्रूला मात्र दुर्गम असा किल्ला महाराजांनी स्वतः बांधला.
रायगडाच्या तळातून गांधारी आणि काळ ह्या दोन्ही नद्या वाहतात. रायगडाच्या संरक्षणार्थ लिंगाणा, कोकणदिवा, मानगड, विश्रामगड, पन्हाळघर, सोनगड, मंगळगड आणि कावळ्या असे ८ किल्ले आहेत.
'जिब्राल्टर ऑफ द ईस्ट'
मध्ययुगीन ब्रिटीशांनी रायगडाला 'जिब्राल्टर ऑफ द ईस्ट' असे संबोधले. वास्तविक जिब्राल्टर हे त्यांच्या दृष्टीने मजबूत लष्करी ठाणे असले तरी त्याला रायगडासारखा तेजस्वी इतिहास नाही. वस्तुतः जिब्राल्टरलाच 'रायगड ऑफ द ईस्ट' असे संबोधायला हवे.
किल्ले रायगडावरील महत्वाच्या वास्तू
- पाचाडखिंडीतील वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा
- चित दरवाजा
- खूबलढा बुरुज
- नाणे दरवाजा
- वाळसुरे खिंडीतील भुयार
- महादेवाचा माळ
- अंधारी
- महादरवाजा
- महादरवाज्यातील शिलालेख
- हत्ती तलाव
- लोहस्तंभ
- हनुमान टाके
- धान्यकोठारे
- टकमक टोक
- गंगासागर तलाव
- मनोरे
- पालखी दरवाजा
- सचिवांची कार्यालये
- राजवाडा
- राणीवसा
- खलबतखाना
- टांकसाळ
- राजसभा
- सिंहासन
- नगारखाना
- मेघडंबरी
- हिरकणी टोक
- होळीचा माळ
- होळीच्या माळावरील पुतळा
- शिर्काई देवी
- शिर्काई देवीच्या पीठावरील शिलालेख
- गजशाळा
- बाजारपेठ
- श्रीगोंदे टोक
- कुशावर्त
- वाघ दरवाजा
- भवानी टोक, भवानी गुहा, भवानी कडा, भवानी देवी
- कोळींब तलाव
- बाराटाकी
- शिवसमाधी स्मारक
- जगदीश्वर मंदिर
- जगदीश्वर मंदिर प्रवेशद्वाराजवळचा शिलालेख
- जगदीश्वर मंदिर प्रवेशद्वाराच्या पायरीवरील शिलालेख
- वाघ्या कुत्रा
- रायगडावरील वैशिष्टयपूर्ण भुयारी खोदकामे