१) शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम - श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाची स्थापना लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने १८९५ साली झाली. प्रामुख्याने दोन उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन ही स्थापना केली गेली. त्यातील पहिले म्हणजे गडावरील समाधीची व इतर वास्तूंची देखभाल, दुरुस्ती व जीर्णोद्धार आणि दुसरे म्हणजे शिवपुण्यतिथीचा अभिवादन कार्यक्रम करणे, शिवचरित्राचा प्रचार, प्रसार करणे. गेले १२३ वर्षे रायगडावर होणारा शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम याच मंडळाच्या माध्यमातून आयोजित केला जात आहे. यावर्षी शनिवार दि. ३१ मार्च २०१८ रोजी झालेल्या कार्यक्रमास पू. सरसंघचालक मोहनजी भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांचे हस्ते शिवभक्त प्रतिष्ठान, पंढरपूर या संस्थेला नववा 'श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार' प्रदान करण्यात आला. यावेळी हिंदवी स्वराज्यातील शूर सरदार कान्होजी जेधे यांचे वंशज इंद्रजीत जेधे आणि मनोज जेधे यांचा तसेच मेजर जनरल मनोज ओक (निवृत्त) यांना सन्मानित करण्यात आले. दुर्गमहर्षी कै. प्रमोदजी मांडे यांना मरणोत्तर विशेष पुरस्कार देण्यात आला. आदल्या रात्री शाहीर सज्जनसिंह राजपूत यांचा शाहिरी कार्यक्रम झाला तसेच सर्व मान्यवरांच्या प्रकट मुलाखती घेण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशभरातून सुमारे वीस हजार शिवभक्त उपस्थित होते.
२) गडारोहण स्पर्धा - मागील २५ वर्षे मंडळातर्फे रायगड गडारोहण स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षी एकूण ६ वयोगटातील सुमारे २५० स्त्री आणि पुरुष स्पर्धाकांनी भाग घेतला होता. प्रत्येक गटातील प्रथम ५ स्पर्धकांना रोख पारितोषिके देण्यात आली. प्रथम क्रमांकांच्या विजेत्यांना शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात आली.
३) वीर बाजी पासलकर पुरस्कार - हिंदवी स्वराज्या स्थापनेत पहिल्याच मोठ्या आक्रमणात हौतात्म्य पत्करलेले वीर बाजी पासलकर यांचे स्मरणार्थ वीर बाजी पासलकर स्मारकात मंडळाकडून दिला जाणारा पुरस्कार यंदा १९७१ च्या भारत पाक युद्धाचे महान हिरो वीरचक्र विजेते एअर कमाडोर अशोक शिंदे (निवृत्त, Vrc VM & MGS) यांना मेजर जनरल विजय पवार (निवृत्त, AVSM, VSM) यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे, वीर बाजी पासलकरांचे वंशज शाहीर दादा पासलकर आणि लक्ष्मणबापू पासलकर, ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. पांडुरंग बलकवडे, मंडळाचे अध्यक्ष श्री. जगदीश कदम, कार्यवाह श्री. सुधीर थोरात उपस्थित होते.
४) राजमाता जिजाऊ पुरस्कार - हिंदवी स्वराज्य निर्मितीच्या कार्यात शिवरायांच्या आई जिजाऊ यांची भूमिका फार मोलाची होती. त्यांचा त्याग आणि कणखरपणा याचे दीर्घकालिन परिणाम झाले. त्यांच्या स्मरणार्थ वीर बाजी पासलकर स्मारकात मंडळाकडून दिला जाणारा राजमाता जिजाऊ पुरस्कार यंदा श्रीमती नलिनीताई बलकवडे यांना ज्येष्ठ उद्योजिका श्रीमती स्मिताताई घैसास यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) श्री. विठ्ठलराव जाधव, सामाजिक कार्यकर्ते श्री. जगन्नाथ लडकत, ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. पांडुरंग बलकवडे, मंडळाचे कार्यवाह श्री. सुधीर थोरात आणि नलिनीताईंचे चिरंजीव डॉ. निलेश बलकवडे उपस्थित होते.
५) सिंहगड विजय दिन - नरवीर नावजी बलकवडे पुरस्कार - छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाने जिंकून घेतलेला सिंहगड तानाजी मालुसरेंसारखा पराक्रम गाजवून आषाढ शुद्ध अष्टमी दि. १ जुलै १६९३ या दिवशी सरदार नावजी बलकवडे यांनी पुन्हा जिंकून घेतला. या दिनाच्या निमित्ताने सकाळी किल्ले सिंहगडावर आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. पांडुरंगजी बलकवडे, मोडी लिपीचे अभ्यासक श्री. राजेंद्रजी ढुमे आणि मंडळाचे कार्यवाह श्री. सुधीर थोरात यांनी या विजय दिनाची माहिती दिली. त्याच दिवशी सायंकाळी वीर बाजी पासलकर स्मारकात झालेल्या कार्यक्रमात कमाडोर अजय चिटणीस (निवृत्त, SC NM) यांना लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर (निवृत्त, PVSM, UYSM, VSM) यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. पांडुरंग बलकवडे, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती रजनी इंदुलकर तसेच मंडळाचे कार्यवाह श्री. सुधीर थोरात उपस्थित होते.
६) 'छत्रपती शिवाजीमहाराज' ग्रंथ प्रकाशन - शिवचरित्राच्या प्रसारासाठी मंडळ अनेक उपक्रम करीत असते. त्याचाच एक भाग म्हणून मंडळाने शिवचरित्राचे अभ्यासक डॉ. केदार फाळके लिखित 'छत्रपती शिवाजीमहाराज' या ग्रंथाचे प्रकाशन वीर बाजी पासलकर स्मारकात झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. पांडुरंग बलकवडे यांचे हस्ते रविवार दि. ९ सप्टेंबर २०१८ रोजी केले. याप्रसंगी मा. दादा रावत आणि डॉ. केदार फाळके यांची शिवचरित्राची आजच्या काळातील आवश्यकता सांगणारी भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे कार्यवाह श्री. सुधीर थोरात यांनी केले.
७) शिवचरित्र स्पर्धा - शिवचरित्र हे संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयावरती कोरले गेले आहे. शिवचरित्र आणि मराठेशाहीच्या इतिहासाचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करीत असतो. महाराष्ट्रामध्ये चाललेल्या प्रयत्नांमधून विद्यार्थ्यांना काही वेगळे देता येईल का? असा विचार करणे आवश्यक होते. तो विचार करून श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ शिवचरित्राची स्पर्धा आयोजित करीत आहे.
डॉ. केदार फाळके लिखित 'छत्रपती शिवाजीमहाराज' या ग्रंथावर आधारित संपूर्ण महाराष्ट्रातील ७ वी ते १० वी च्या शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा घेण्याचे मंडळाने ठरविले आहे. स्पर्धेसाठी प्रत्येक विद्यार्थ्यास हा ग्रंथ वाचणे बंधनकारक आहे. या ग्रंथातून शिवचरित्राचे योग्य आकलन होईल आणि भरपूर ज्ञान मिळेल. यामागील हेतू केवळ शिवचरित्रावरील स्पर्धा घेणे एवढ्यापुरता मर्यादित किंवा तात्कालिक नसून सर्व विद्यार्थ्यांना उज्वल भवितव्यासाठी कायमस्वरूपी शिदोरी देणे हा आहे.
या स्पर्धेच्या संयोजनासाठी शिक्षण संस्थाचालक आणि शाळांशी संपर्क करायचा आहे.
८) रायगड रोपवे - १९८७ साली मंडळाने महाराष्ट्र शासनाला सादर केलेल्या किल्ले रायगड विकास आराखड्यातील मंजूर झालेला रोप वे मंडळाने जोग इंजिनियरिंग लिमिटेड, पुणे यांचे सहकार्याने १९९६ साली सुरु केला. त्याचे उद्घाटन तत्कालिन पू. सरसंघचालक श्री. रज्जुभैय्या यांचे शुभहस्ते झाले.
९) रायगड शिवसृष्टी - मंडळाने किल्ले रायगडाच्या पायथ्याशी जागा घेतली असून तिथे पुढील प्रकल्प केले जाणार आहेत * ३५० वर्षांपूर्वीच्या रायगड किल्ल्याची प्रतिकृती * चित्रफित सभागृह * शिवभक्त निवास * संग्रहालय * ग्रंथालय
१०) संदर्भ ग्रंथालय आणि अभ्यासिका - मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित पुस्तके, कागदपत्रे, विशेषतः मोडी लिपीतील कागदपत्रे यांचे संदर्भ ग्रंथालय सुरु करण्याचा मंडळाचा मानस आहे. यासाठी मंडळाने आत्तापर्यंत १४०० पुस्तकांची यादी तयार केली असून ती अभ्यासकांसाठी उपलब्ध केला जाणार आहे.