शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम - श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाची स्थापना लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने १८९५ साली झाली. प्रामुख्याने दोन उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन ही स्थापना केली गेली. त्यातील पहिले म्हणजे गडावरील समाधीची व इतर वास्तूंची देखभाल, दुरुस्ती व जीर्णोद्धार आणि दुसरे म्हणजे शिवपुण्यतिथीचा अभिवादन कार्यक्रम करणे, शिवचरित्राचा प्रचार, प्रसार करणे. गेले १२३ वर्षे रायगडावर होणारा शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम याच मंडळाच्या माध्यमातून आयोजित केला जात आहे. यावर्षी शनिवार दि. ३१ मार्च २०१८ रोजी झालेल्या कार्यक्रमास पू. सरसंघचालक मोहनजी भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांचे हस्ते शिवभक्त प्रतिष्ठान, पंढरपूर या संस्थेला नववा 'श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार' प्रदान करण्यात आला. यावेळी हिंदवी स्वराज्यातील शूर सरदार कान्होजी जेधे यांचे वंशज इंद्रजीत जेधे आणि मनोज जेधे यांचा तसेच मेजर जनरल मनोज ओक (निवृत्त) यांना सन्मानित करण्यात आले. दुर्गमहर्षी कै. प्रमोदजी मांडे यांना मरणोत्तर विशेष पुरस्कार देण्यात आला. आदल्या रात्री शाहीर सज्जनसिंह राजपूत यांचा शाहिरी कार्यक्रम झाला तसेच सर्व मान्यवरांच्या प्रकट मुलाखती घेण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशभरातून सुमारे वीस हजार शिवभक्त उपस्थित होते.