२०१६ साली पुणे महानगरपालिकेने सिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर स्मारक ११ महिन्यांच्या कराराने श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाकडे हस्तांतरित केले. शुक्रवार दि. ६ जानेवारी २०१७ रोजी मा. पालकमंत्री गिरीशजी बापट यांच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन झाले
२. वीर बाजी पासलकर पुण्यतिथी
हिंदवी स्वराज्याचे पहिले सेनापती वीर बाजी पासलकर यांच्या ३६८ व्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा कार्याक्रम मंगळवार दि. २३ मे २०१७ रोजी संपन्न झाला. याप्रसंगी मेजर जनरल सी. डी. सावंत (AVSM, SM ) यांना वीरचक्र विजेते कर्नल सदानंद साळुंखे यांच्या हस्ते वीर बाजी पासलकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानिमित्ताने वीर बाजी पासलकर आणि यांचे वंशजांच्या पराक्रमावर आधारित प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.
३. शिवराज्याभिषेक दिन सोहळा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४३ व्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हिंदवी स्वराज्याची गुढी उभारण्याचा सोहळा मोठ्या उत्सहात संपन्न झाला
४. राजमाता जिजाऊ पुरस्कार
मंडळाच्या वतीनेराजमाता जिजाऊंच्या पुण्यतिथीला रविवार दि. १८ जून २०१७ रोजी प्रथमच 'राजमाता जिजाऊ पुरस्कार' घोषित करण्यात आला. ज्यांच्या प्रेरणेमुळे कुटुंबातील ९ शूरवीर भारतीय सैन्यदलातून देशसेवा करीत आहेत करीत आहेत, ज्यांचे पूर्वज हिंदवी स्वराज्याचे सेनापती होते अशा श्रीमती सुजाताताई हसबनीस यांना भारताच्या माजी राष्ट्रपती महामहीम प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात आला. एअर मार्शल मा.श्री. भूषणजी गोखले (निवृत्त) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
५. नरवीर नावजी बलकवडे पुरस्कार
छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाने जिंकून घेतलेला सिंहगड तानाजी मालुसरेंसारखा पराक्रम गाजवून आषाढ शुद्ध अष्टमी दि. १ जुलै १६९३ या दिवशी सरदार नावजी बलकवडे यांनी पुन्हा जिंकून घेतला. या दिनाच्या निमित्ताने रविवार दि. २ जुलै २०१७ रोजी वीर बाजी पासलकर स्मारकामध्ये पुण्याचे माजी पोलीस आयुक्त श्री. जयंत उमराणीकर यांना थोर विचारवंत आणि व्यंगचित्रकार श्री. मंगेश तेंडूलकर यांच्या हस्ते नरवीर नावजी बलकवडे शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
६. छत्रपती शिवाजी अध्यासनाची स्थापना
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने वीर बाजी पासलकर स्मारकामध्ये छत्रपती शिवाजी अध्यासन स्थापना केले असून मंगळवार दि. १५ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ६.०० वा. उद्घाटन सोहळा आयोजित केला होता. अखिल भारतीय मराठा विकास परिषदेचे अध्यक्ष आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज श्री. जयवंतराव मोहिते यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पुरातत्ववेते डॉ. गो. बं. देगलूरकर, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ इतिहासकार डॉ. सदाशिव शिवदे, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, पुण्याचे माजी खासदार प्रदीप रावत, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष श्री. जगदीश कदम, कार्यवाह श्री. सुधीर थोरात तसेच वीर बाजी पासलकरांचे वंशज राजाभाऊ पासलकर उपस्थित होते.
७. मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग आणि वाचक संमेलन
मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सुमारे ५ कोटी कागदपत्रे आणि पुरावे मोडी लिपीमध्ये उपलब्ध आहेत. परंतु मोडी लिपी जाणणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. शासनाने १९५७ सालच्या सुमारास शाळेतून मोडी लिपी शिकवणे बंद केले. मोडी लिपीतील ऐतिहासिक कागदपत्रांच्या लिप्यांतराला चालना मिळावी यासाठी मंडळाने ०२ नोव्हेंबर २०१७ ते १७ डिसेंबर २०१७ या कालावधीत वीर बाजी पासलकर स्मारकामध्ये मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग आयोजित केला होता. या वर्गाला उदंड प्रतिसाद मिळाला. १२० जणांनी भाग घेतला. सर्व सहभागी प्रशिक्षणार्थींची परीक्षा घेण्यात येऊन त्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. त्यानंतर प्रगत वर्गही घेण्यात आला. मोडी लिपीतील कागदपत्रे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असली तरी त्यांचे संशोधन करून मराठीमध्ये लिप्यांतर करणे आवशक आहे. यासाठी मंडळाने मोडी लिपी प्रगत वर्गात तयार झालेल्या जाणकारांकडून या कागदपत्रांचे मराठी लिप्यांतर करून त्याचे खंड प्रकाशित करण्याचे ठरविले आहे. रियासतकार सरदेसाई यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात पुण्यातील पेशवे दफ्तरामधून संशोधनासाठी निवडलेली कागदपत्रे सुमारे पन्नास हजार इतकी आहेत. या कागदपत्रांचे वर्गीकरण करून मंडळ सुमारे १०० खंड प्रकाशित करणार आहे. यासाठी फार मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे.
खंडाचे प्रातिनिधिक विषय पुढील प्रमाणे आहेत -
मराठ्यांचे कर्नाटकमधील सांस्कृतिक योगदान
मराठ्यांचे तामिळनाडूमधील सांस्कृतिक योगदान
मराठ्यांचे ओडिसामधील सांस्कृतिक योगदान
मराठ्यांचे गुजरातमधील सांस्कृतिक योगदान
मराठ्यांचे कर्नाटकमधील सांस्कृतिक योगदान
मराठ्यांचे बंगाल मधील सांस्कृतिक योगदान
मराठ्यांचे बुंदेलखंडमधील सांस्कृतिक योगदान
मराठ्यांचे रोहिलखंडमधील सांस्कृतिक योगदान
मराठ्यांचे दिल्लीमधील सांस्कृतिक योगदान
मराठ्यांचे माळव्यामधील सांस्कृतिक योगदान
मराठे रजपूत संबंध
मराठ्यांचे पानिपतमधील राष्ट्रीय योगदान
मराठ्यांची जंजिरेकर सिद्दीशी संघर्ष मोहीम
मराठ्यांचा पोर्तुगीजांशी संघर्ष
मराठ्यांची वसई मोहीम
मराठ्यांचा इंग्रजांशी संघर्ष
मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष
मराठ्यांचा निजामाशी संघर्ष आणि संबंध
मराठ्यांचा हैदरअलीशी संघर्ष
मराठ्यांचा टिपूशी संघर्ष
मराठ्यांचे धार्मिक आणि सांस्कृतिक योगदान कार्य
मराठ्यांची न्यायव्यवस्था
मराठ्यांची लष्करीव्यवस्था
मराठ्यांचे प्रशासन
पेशवे छत्रपती संबंध
मराठ्यांचा तोफखाना
मराठ्यांचे दुर्ग - व्यवस्थापन आणि प्रशासन
८. रायगड किल्ला जतन, संवर्धन व परिसर विकास आराखडा प्राधिकरण
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पुढाकार घेऊन युवराज श्री. संभाजीराजे छत्रपती यांचे अध्यक्षतेखाली रायगड किल्ला जतन, संवर्धन व परिसर विकास आराखडा प्राधिकरण स्थापन केले. या प्राधिकरणाला रायगड किल्ल्याच्या जतन व संवर्धनाच्या कामांबरोबरच परिसरातील गावांचा विकास आराखडा तयार करून स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने अंमलबजावणी करण्याचे अधिकार दिले आहेत. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे आजवरचे रायगड किल्ल्यासंदर्भातील योगदान पाहून शासनाने मंडळाच्या पुढील तीन सदस्यांना प्राधिकरणाचे सदस्य म्हणून नेमले आहे.
श्री. रघुजीराजे आंग्रे
श्री. पांडुरंग बलकवडे
श्री. सुधीर थोरात
प्राधिकरणाच्या नियमित बैठका सुरु झाल्या असून विकास आराखड्यानुसार गडावर अनेक कामे यापूर्वीच सुरु झाली आहेत. मंडळाच्या योगदानाची योग्य ती दखल घेऊन प्राधिकरणात काम करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आणि विशेषतः मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभारी आहोत. रायगड किल्ला जतन, संवर्धन व परिसर विकास आराखडा प्राधिकरण या माध्यमातून शिवछत्रपतींची राजधानी किल्ले रायगडाला पुनर्वैभव प्राप्त करून देऊन जगाच्या नकाशावर महत्वाचे केंद्र म्हणून प्रस्थापित करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
९. शिवशंभू विचार दर्शन कार्यशाळा
२०१६
शिवचरित्र आणि मराठेशाहीचा वैभवशाली इतिहास योग्य व अभ्यासपूर्ण रितीने सर्वत्र पोहचावा यासाठी मंडळाने २०१६ साली पहिल्यांदा शिवशंभू विचारदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत शिवचरित्र तसेच मराठेशाहीच्या इतिहासावरील वक्ते, लेखक, अभ्यासक आणि सोशल मिडियामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना निमंत्रण दिले होते. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून १३३ महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. एकूण ८ सत्रांमध्ये शिवचरित्राचे महत्त्व आणि बारकावे संदर्भासहित मांडण्यात आले.
२०१७
यावर्षी कार्यशाळेचे दुसरे वर्ष होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात १६८० ते १७०७ या २७ वर्षांमध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती महाराणी ताराबाई यांचा औरंगजेबाशी झालेला संघर्ष या विषयावर एकूण ८ सत्रे झाली.
२०१८
यंदा कार्यशाळेचे तिसरे वर्ष आहे. औरंगजेबाच्या मृत्युनंतर मराठेशाहीचा अटक ते कटक असा झालेला राज्यविस्तार आणि सांस्कृतिक योगदान या विषयावर एकूण ८ सत्रे होणार आहेत.